करमाळा प्रतिनिधी
2024 विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार संजयमामा शिंदे यांच्या कॉर्नर बैठका व जाहीर सभांचे सत्र सुरू असून त्याला उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद मिळत आहे. मतदारांच्या या उत्साहाबद्दल वाढत्या प्रतिसादाबद्दल बोलताना ते म्हणाले की, 2014 पासून ही माझी तिसरी विधानसभा निवडणूक आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा
निवडणूकही मी पाहिली आहे. परंतु प्रथमच 2024 च्या या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत मी अंडर करंट पाहतोय. वरकटणे या छोट्याशा गावाने मला 2019 साली अवघी 184 मते दिली होती. त्याच गावात परवाच्या वरकटणे येथील सभेला मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक होता. आज कंदर येथील सभेलाही असाच प्रतिसाद मिळत आहे. मतदारांनीच आता निवडणूक हातात घेतलेली असून येत्या 23 तारखेला त्याचा रिझल्ट निश्चितच दिसेल असे भाष्य आमदार संजयमामा शिंदे यांनी कंदर येथील सभेप्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर निळकंठ देशमुख, चंद्रकांत सरडे, विलास पाटील, अण्णासाहेब पवार, नानासाहेब लोकरे, अॅड. नितीन राजे भोसले, कन्हैयालाल देवी, अॅड. शिवराज जगताप, संजय घोलप, गणेश चिवटे, हनुमंत मांढरे पाटील, तानाजी झोळ, प्रवीण जाधव, विवेक येवले, अॅड. अजित विघ्ने, सूर्यकांत पाटील, अमोल काळदाते आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, मी चंद्र, सूर्य देईन मी सोन्याचा धूर काढीन अशी वलगना मी कधीच करत नाही. मी तोलून बोलतो, जे बोलतो ते करून दाखवतो. जी होण्याची शक्यता आहे तेच मी बोलतो, अवास्तव कधी बोलत नाही. त्यामुळे मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही. भलेही माझ्याकडून दोन विकासकामे राहिली असतील ती भविष्य काळामध्ये मी करेल परंतु कोणाचंही वाईट माझ्या हातून घडलेलं नाही.
यावेळी जयवंतराव जगताप गटाचे अण्णासाहेब पवार यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला, तर नानासाहेब लोकरे यांनी बागल गटामधून शिंदे गटात प्रवेश केला.