शेलगाव क येथील ग्रामदैवत नागनाथ महाराजांची उद्या यात्रा…..
यात्रेनिमित्त भारुड, छबिना ,रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन.
प्रतिनिधी
शेलगाव क चे ग्रामदैवत नागनाथ महाराजांची यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी असते. परंपरेप्रमाणे रविवारी रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो. सोमवारी सकाळी नागनाथ महाराजांची पालखी गावातून काढली जाते. सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये पालखी सोहळा संपन्न होतो .त्यानंतर 10 ते 2 या वेळेमध्ये राज्यभरातून आलेल्या नामांकित प्रबोधनकार भारूडकार यांच्या भारुडांचा कार्यक्रम होत असतो. मनोरंजनातून प्रबोधन असा हा कार्यक्रम असतो. या भारुडकरांना योग्य मानधन व वाहतूक खर्चही दिला जातो .दुपारी 2 नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.रात्री नागनाथ महाराजांची मिरवणूक छबिना काढला जातो.
सामाजिक बांधिलकी जपत २०१८ पासून गावातील युवक वर्गांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात होते, परंतु मध्यंतरी कोविड नंतर यामध्ये खंड पडला होता, ती परंपरा या वर्षी पुन्हा सुरू करण्यात येत असून रक्तदान शिबिराचे आयोजनही सकाळी केलेले आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन आहे यात्रा कमिटीने केले आहें.
शेलगाव क चे ग्रामदैवत नागनाथ महाराज हे जागृत देवस्थान मानले जाते. पंचक्रोशीतील सौंदे, वरकटणे ,देवळाली, अर्जुननगर,फिसरे आदी गावातील भावीक फक्त मोठ्या संख्येने या यात्रा उत्सवांमध्ये सहभागी होत असतात. तालुक्यातील नागरिकांनी यात्रा सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.