करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.2 या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेच्या सेंद्रिय परसबागेमध्ये वर्षभर जोपासलेल्या ऊसाचा रस मनसोक्त पिण्याचा आनंद लुटला.
वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी अट्टहास धरणाऱ्या या शाळेत नाविन्यपूर्ण अशी सेंद्रिय परसबाग उभारली आहे. या परसबागेमध्ये वेगवेगळ्या भाजीपाला तर पिकवला जातोच शिवाय शाळेत उसाची
लागवड केलेली आहे. या परसबागेमध्ये कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खताचा कणभरही वापर केला जात नाही, केवळ गोमूत्रच्याच मदतीने हा सेंद्रिय ऊस वर्षभर सांभाळलेला आहे. ही शाळा माळरानावर असून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत केवळ
42 पट आहे. अशाही परिस्थितीमध्ये या दोन शिक्षकांनी माळरानावर मोठ्या जिद्दीन ही परसबाग फुलवलेली आहे. सलग चार दिवस झाले या शाळेतील मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे हे स्वतः ऊस तोडतात आणि मुलांना गावातील युनूस शेख यांच्या
रसवंतीगृहावर घेऊन जातात. त्या ठिकाणी गावातील युवा वर्ग तसेच सहकारी शिक्षक किरण जोगदंड यांच्या मदतीने उसाचा रस काढून सर्व विद्यार्थ्यांना त्याचे वाटप केले जाते आणि विद्यार्थी मन मुरादपणे या रसाचा आनंद लुटतात. एवढेच नाही तर गावातील अनेक पालकांनी व ग्रामस्थांनीही या उसाचा रस पिण्याचा आनंद लुटला आहे. असा निरोगी आणि शरीराला पौष्टिक असणारा उसाचा रस मनसोक्तपणे पिण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. गेल्या वर्षीही त्यांनी ऐन उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना असा शाळेतील सेंद्रिय परस बागेतील उसाचा रस पिण्याचा आनंद उपलब्ध करून दिला होता.
आज प्रत्येक भाजीपाला अथवा फळावर विविध रासायनिक औषधांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेकी वापर होत असतानाच पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला ऊस आणि त्याचा रस मुलांना उपलब्ध करून देण्यात विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया बोडखे यांनी व्यक्त केली. यातून आम्ही सेंद्रिय शेती आणि तिचे महत्त्व विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना समजावून देण्याचा प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हा उपक्रम केवळ एक-दोन दिवसांचा किंवा आठवड्यांचा नसून पूर्ण वर्षभर यासाठी मुलांनी आणि शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे असे मत तालुक्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत आणि गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना असे जीवनोपयोगी शिक्षण देत असल्याबद्दल आणि समाजामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून सांगत असल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी सुग्रीव नीळ, जयवंत नलावडे, सरपंच सुवर्ण मोरे, शा.व्य स. अध्यक्ष संतोष झेंडे, केंद्रप्रमुख महावीर गोरे तसेच गावातील मान्यवरांनी, पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि उपशिक्षक किरण जोगदंड यांचे भरभरून कौतुक केले.