करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील फंड गल्ली परिसरात मागील चार ते पाच दिवसांपासून घाण पाणी येत आहे. याबाबत संबंधित विभागात तक्रार करूनही अजूनही घाणच पाणी संबंधित नागरिकांना प्यावे लागत आहे. यामुळे मंगळवार पर्यंत दुरुस्ती न झाल्यास तेच
पाणी मुख्याधिकारी यांना पाजणार असल्याचा इशारा सोलापूर जिल्हा मनसे उपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी दिला आहे. करमाळा नगर परिषदेच्या नळाला चार दिवसांनी पाणी सुटते. सुटल्यानंतर घाण पाणी करमाळा शहरातील नागरिकांना प्यावे
लागत आहे. मुळातच उजनी जलाशयात पाणी उपलब्ध असतानाही यांच्या चुकीच्या पद्धतीच्या नियोजनामुळे करमाळकरांना तीन ते चार दिवसाला पाणी मिळत आहे.त्यातही अशा पद्धतीचे घाण पाणी प्यावे लागत आहे. दुरुस्तीसाठी केवळ एक दिवस
पुरेसा असतानाही मागील चार ते पाच दिवसांपासून नुसत्या तक्रारी जात आहेत. परंतु सदरची दुरुस्ती केली जात नाही. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप आहे. लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा मुख्याधिकारी यांना तेच पाणी पाजून आंदोलन करणार आहे असे मोरे म्हणाले.