करमाळा प्रतिनिधी
“देव आला घरा नंदाचिया गावा |
धन्य त्यांच्या दैवा देव आले ||”
मित्रांनो, फोटोमधे जे मंदीर आपणासमोर आहे ते करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील मौजे दिवेगव्हाण येथील “विठ्ठल-रुक्मणी मंदीर” आहे. या गावाला पुर्वी पासुनच हे मंदीर होते. अगदी हुबेहुब पंढरपुरच्या विठ्ठल मंदीराची प्रतिकृती असणारे,
पुरातन असणारे मंदीराचा आता नव्याने जिर्णोध्दार करण्यात आला असुन येथील ग्रामस्थांनी लोक वर्गणीच्या माध्यमातुन हे अप्रतिम मंदीर ऊभारलेले आहे. साधारण एक ते दीड कोटींची लोकवर्गणी जमा करून हे मंदीर उभारण्यात आलेले असुन हे
मंदीर उभारताना आमदार संजयमामा शिंदे यांनी दिलेल्या दहा लाख आमदार निधी व्यतिरिक्त उर्वरीत सर्व पैसा या गावातील लोकांनी स्वतः लोकवर्गणीतून उभा केलेला आहे. मंदीराचे परिसरात असणारे लोकांनी स्वतःची घरजागा मंदीरासाठी दान
दिलेली असुन मंदीराचे शेजारी सुंदर आणि स्वच्छ परिसर दिसुन येत आहे. नुकताच या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण समारंभ पार पडला असुन मंदीर भाविक भक्तांना दर्शणासाठी विनामुल्य ठेवलेले आहे.
दिवेगव्हाण गावचे प्रत्येक नागरिकांनी केलेल्या या कामाची नोंद सातासमुद्रापार नक्कीच पोहोचणार आहे. अतिशय अप्रतिम असणारे हे मंदीर भाविक भक्तासाठी नक्कीच प्रति पंढरपुर ठरणारे आहे. वस्तुतः मला या ठिकाणी आवर्जुन नमुद करावेसे
वाटते की, आपला भाग झपाट्याने विकसित होत आहे. भिमा नदीचे विस्तीर्ण पात्राचे शेजारी नयनरम्य अशी हिरवाई नटली आहे. पक्ष्यांचे थवेच्या थवे या पाणवठयावर येतात त्यामुळे पर्यटनासाठी व पक्षी निरिक्षणासाठी गर्दी वाढत चाललेली आहे.
त्यामुळे या भागात पर्यटनाला चालना दिल्यास रोजगार निर्मितीसह उदयोगधंदे वाढणार आहेत. जवळच पारेवाडी रेल्वे स्टेशन परिसर हाकेच्या अंतरावर आहे. आपण चांडगाव ते पोमलवाडी पुलाची मागणी करतोय ज्यामुळे फलटण-नातेपुते-बारामती चा परिसर डायरेक्ट पोमलवाडी-केत्तुर-कोर्टी-राशिन व करमाळा असा जोडला जाणार असुन पश्चिम महाराष्ट्राचे मराठवाडयाशी कनेक्शन होणार आहे. त्यामधे दिवेगव्हाण चे हे मंदीर प्रति पंढरपुर म्हणुन विकसित होईल हे निश्चित. दिवेगव्हाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदीराप्रमाणेच केत्तुरचे पुरातन किर्तेश्वर मंदीर,पोमलवाडी येथील पोमाई मंदीर, कात्रज येथील निलकंठेश्वर मंदीर ही मंदीरे विकसित होऊ शकतात व पर्यटकांचे आकर्षण होऊ शकतात. हे शक्य आहे कारण दिवेगव्हाण करांनी त्यांचे एकीतुन दिड कोटींचे मंदीर उभारले, केत्तुर व पोमलवाडी करांनी लोकवर्गणीतून कोट्यावधींचे मोठ मोठ्ठे पुल बांधले म्हणजे अशक्य ती गोष्ट साध्य केल्याची जिवंत उदाहरणे आहेत. हे सर्व करताना आता सर्वांनी बैठकीचे माध्यमातुन लोक सहभाग घेऊन आपल्या भागातील भौतिक साधन संपत्तीचे ब्रँडीग करून व्यवसायिक स्वरूप कसे आणता येईल हे पण पाहीले पाहीजे. आपण तिरुपती बालाजी दर्शनासाठी कधी गेला असालच तर तिथे जर आपण व्यवस्थित निरिक्षण केले तर बालाजी देवस्थान व्यतिरिक्त पन्नास शंभर किलोमीटरचे अंतरात अनेक मंदीरे आहेत त्यामधे गणपती मंदीर, कालहस्ती, भगवान शंकराचे मंदीर, महालक्ष्मी मंदीर, श्रीकृष्ण मंदीर अशी बरीच मंदीरे दिसुन येतात. बऱ्याच ठिकाणी मोठ मोठी गार्डन्स, रेस्ट हाऊस उभारलेली दिसुन येतात. या सर्व मंदीरांना भेटी घडविण्यासाठी गाईडस आणि प्रवासी वाहनांचा व्यवसाय, लॉजिंग तसेच रेस्टॉरंट चा व्यवसाय तेजीत असलेचे दिसुन येते. काही ठिकाणी तर खाजगी व्यवसायकांनी ग्रुप्स करून मंदीरांची उभारणी केलेचे दिसुन येते. प्रत्येक मंदीरात कायम पुजा, आर्चा, होम हवन विधी चालु असतात आणि विशेष म्हणजे दर्शनासाठी शंभर रुपयांपासुन पुढे तिकीट काढुन दर्शन घ्यावे लागते. त्या ठिकाणी येणारे भक्तगण भक्तीभावाने दर्शन घेऊन तृप्त होतात. वास्तविक त्या भागात मोठ मोठी मंदीरे उभारून त्याला व्यावसायिक स्वरूप दिले असुन त्यामुळे परिसराची सुधारणा देखिल झालेचे दिसुन येते. आपला भाग देखिल पर्यटनासाठी सुंदर आणि नयनरम्य आहे. आपणही अशा काही गोष्टी साध्य करू शकतो हे नक्की!
मला माहीत आहे पॉझिटीव्ह विचारांची बैठक असली की काहीही साध्य होते. आज आपल्या दिवेगव्हाणचे प्रत्येक नागरिकाचे कौतुक करावे तेवढे थोडे होईल. त्यांनी एकजुटीने आणि भक्तीभावाने अतिशय देखणे विठ्ठल रुक्मिणी मंदीर उभारलेले आहे. पंढरपुरला जाऊन विठोबा रखुमाई चे दर्शन आपण घेतोच पण आज साक्षात विठ्ठल रखुमाई चे दर्शन आपणास या प्रति पंढरपुरला देखिल लाभलेले आहे. नक्कीच प्रत्येक भाविक भक्तांनी निश्चित मंदिरास भेट द्यावी. अशी विनंती आहे.
“आजि संसार सुफळ झाला गे माय! देखियेले पाय विठोबाचे!!”
प्रति पंढरपुर- दिवेगव्हाण ता. करमाळा, जि. सोलापुर येथे नक्की भेट दया ! ॲड. अजित सर्जेराव विघ्ने- केत्तुर ता- करमाळा.