भाळवणी येथील सरकार मान्य बिअर शॉपीमध्ये झाली चोरी, अद्यापपर्यंत गुन्हा नोंदच नाही.
करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील भाळवणी गावाच्या हद्दीमध्ये असलेले सरकारमान्य आर्यन बियर शॉपीमध्ये दिनांक 24 मार्च 2023 रोजी रात्रीच्या 2 वाजून 35 मिनिटांनी तीन दरोडेखोरांनी चोरी केलेली आहे. यामध्ये एकूण 10 हजार रुपयांपर्यंतचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे दुकानाचे मालक मच्छिंद्र शिंदे यांनी माहिती दिली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, मच्छिंद्र शिंदे यांचे जेऊर ते टेंभुर्णी हायवेलगत भाळवणी गावाच्या हद्दीमध्ये आर्यन बिअर शॉप या नावाने दुकान आहे. शिंदे हे दररोजच्या प्रमाणे दि. 24 मार्च रोजी ठीक रात्री 10 वा. बियर शॉप बंद करून, त्यास योग्य प्रकारे कुलूप लावून घराकडे गेले होते. मध्यरात्री 2 वाजून 35 मिनिटांनी तीन अज्ञात व्यक्ती दुकानाच्या शटर जवळ आले. त्यांच्याकडे विविध साहित्य होते. त्यांनी कटरने दुकानाचे शटर उचकटले. व दुकानाच्या बाहेर लावलेले
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वायर कट केले. त्यानंतर त्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील सीसीटीव्हीचे वायर कट करून, गल्ल्यांमध्ये असलेली रोकड काढून घेतली. व दुकानातील एक बिअरचा बॉक्स तसेच इतर साहित्य असा साधारणतः 10 हजार रु.चा ऐवज त्यांनी लंपास केला आहे. दुकानाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना याची चाहूल लागल्यामुळे, त्यांनी दुकानात होत असलेल्या चोरीची कल्पना शिंदे यांना फोन करून दिली. त्यानंतर शिंदे यांनी तात्काळ दुकानाकडे धाव घेतली.
परंतु त्यापूर्वी चोरांनी तेथून पोबारा केला होता. आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला माल बचावला गेला. यानंतर मच्छिंद्र शिंदे हे 25 मार्च रोजी करमाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेले असता, तेथील अधिकाऱ्यांनी त्यांची अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवून घेतली नाही. व याआधी सुध्दा अशाच प्रकारे दुकानामध्ये दोन वेळेस चोरी झाली असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.