शेतकर्यांनी हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा व आपले संभाव्य आर्थिक नुकसान टाळावे : शंभुराजे जगताप
महाराष्ट्र राज्य को. ऑप. मार्केटींग फेडरेशन यांचेवतीने श्री विठ्ठल सर्वसाधारण सह. संस्थेव्दारे करमाळा तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची सोय व वाजवी दाम मिळणेसाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले असून शेतकर्यांनी त्याचा लाभ घ्यावा व आपले होणारे संभाव्यआर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभुराजे जगताप यांनी केले. आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रयत्नातून शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत भरडधान्य हरभरा खरेदी साठी करमाळा येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरु
करण्यात आले आहे. गुढीपाडवा व नूतन वर्षारंभाच्या मुर्हूतावर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभुराजे जगताप यांच्या हस्ते प्रत्यक्ष खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी संचालक हनुमंत दादा बागल होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिपक शिंदे, बाजार समितीचे संचालक मयुर दोशी, सचिव विठ्ठल क्षीरसागर, सहाय्यक सचिव रविंद्र उकिरडे, प्रविण शिंदे गुरुजी, पत्रकार अशोक नरसाळे, बाळासाहेब बागल, संजय साळुंके
यांचेसह शेतकरी उपस्थित होते. जास्तीत जास्त शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी, ऑनलाईन नोंदणीस ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती यावेळी संस्थेचे सचिव सुजीत बागल यांनी प्रास्तविकात दिली. हरभर्याला हमीभाव दर प्रति क्विंटल रुपये ५३३५/- इतका आहे. तरी शेतकर्यांनी शेतकरी तपशील फॉर्म, फोटो, ई पिक पाहणी नोंद असलेला ऑनलाईन ७/१२ उतारा, ८ अ, पिकपेरा, आधार लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स (आयएफएससी कोड स्पष्ट दिसत असलेले), आधारकार्ड, मोबाईल नं. आदी कागदपत्रांसह संस्थेच्या करमाळा मार्केट यार्ड येथील सोलापूर डिसीसी बँकेशेजारील कार्यालयात ऑनलाईन नोंदणी करावी व हरभरा विक्रीस आणावा असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक आदिनाथ मोरे यांनी केले आहे.