करमाळा प्रतिनिधी

नेरले (ता. करमाळा) येथे ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील लोखंडे यांच्या शेतातील ऊस व शेती साहित्याला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

लोखंडे यांच्या गट क्रमांक १६ मधील ट्रान्सफॉर्मरजवळ शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली. यामध्ये उसाचे पीक, ठिबक सिंचन संच, पाईप, भाजीपाला लागवडीसाठी वापरलेले बांबू, एक एकर क्षेत्रातील शेततळ्याचे प्लास्टिक तसेच कृषी विभागामार्फत बांधावर लावलेली आंब्याची झाडे जळून खाक झाली. याशिवाय अन्य शेती साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच जेऊर महावितरणचे अभियंता साळुंखे, वायरमन तानाजी भंडारे, कोतवाल शिवाजी काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नुकसानीचा पंचनामा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी सरपंच औदुंबरराजे राजेभोसले उपस्थित होते.

आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना या आगीमुळे लोखंडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *