
करमाळा प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणंद रस्ते पोहोचले पाहिजेत. रस्त्यांची कामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दर्जेदार आणि टिकाऊ झाली पाहिजेत, अशा स्पष्ट सूचना आमदार नारायण (आबा) गोविंदराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेच्या करमाळा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची आढावा बैठक आज तहसील कार्यालय, करमाळा येथे आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी करमाळा तालुक्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.या बैठकीत आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना केवळ कार्यालयात बसून आढावा न घेता प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाणंद रस्त्यांची पाहणी करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ता पोहोचेल, अशा पद्धतीने नियोजन करावे. रस्त्यांची कामे करताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेतमालाची वाहतूक, शेती अवजारे तसेच इतर सुविधांसाठी या रस्त्यांचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले.

यावेळी उपविभागीय दंडाधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी श्रीमती जयश्री आव्हाड, समितीचे सहअध्यक्ष दिग्विजय बागल, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमिअभिलेख, तालुका कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता, पोलीस निरीक्षक यांच्यासह समिती सदस्य नितीनराजे भोसले यांचे प्रतिनिधी योगिनीराजे राजेभोसले, महेंद्र पाटील, बाबूराव नटके, तात्यासाहेब गोडगे, भागवत मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बारमाही वाहतुकीसाठी सक्षम, दर्जेदार आणि टिकाऊ पाणंद रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असा ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.