शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची चौकशीची मागणी

करमाळा प्रतिनिधी
राज्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी मल्टीकट (तीन वेळा कापणी करता येणारे) चारा बियाणे आणि मका बियाणे खरेदी करण्यासाठी शासनाने सुमारे पाच कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची मागणी आणि चारा उत्पादनाची क्षमता विचारात न घेता कमी उत्पादन देणाऱ्या बियाण्यांची खरेदी करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या या खरेदी प्रक्रियेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.

सध्या शेतकऱ्यांकडून अॅडव्हांटा ७४० जातीच्या मका बियाण्याला तसेच मल्टीकट शुगर ग्रास बियाण्याला मागणी आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागाने आर्थिक हितसंबंधातून कमी चारा उत्पादन देणाऱ्या बियाण्यांची खरेदी करून त्याचे वाटप सुरू केल्याचा आरोप चिवटे यांनी केला आहे.शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या बियाण्याच्या तुलनेत विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या मका बियाण्याच्या उत्पादनात हेक्टरी १० ते १५ टनांची तफावत असल्याचा दावा करण्यात येत आहे. चारा उत्पादनासाठी लागणारे पाणी, खते, जमीन, मेहनत आणि कालावधी समान असताना केवळ बियाण्याच्या दर्जामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते.

यामुळे जवळपास एक लाख टन चारा उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शासनाकडून जवळपास २०० टन बियाणे मोफत वाटपासाठी उपलब्ध होणार असून, या वाटपात शेतकऱ्यांना दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणारे बियाणे द्यावे, अशी मागणी होत आहे.पाच कोटींच्या खरेदीत नेमके काय?बियाणे पुरवठ्यासाठी महाबीज आणि नॅशनल सीड कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाबीजकडून अॅडव्हांटा ७४० मका व मल्टीकट चारा बियाण्याचा सुमारे अडीच कोटी रुपयांचा पुरवठा होणार असल्याची माहिती आहे. तर नॅशनल सीड कॉर्पोरेशनकडून बायोसीड जातीच्या मका बियाण्याचा अडीच कोटी रुपयांचा पुरवठा होणार असल्याचे समजते.नॅशनल सीड कॉर्पोरेशनमार्फत खासगी कंपनीचे मका बियाणे खरेदी करण्यात येत असल्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बायोसीड जातीच्या बियाण्याची बाजारातील किंमत एका चार किलोच्या पिशवीमागे ६०० ते ७०० रुपये असताना शासनाकडून हेच बियाणे ११०० ते १२०० रुपयांना खरेदी करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रत्येक पिशवीमागे सुमारे ६०० रुपयांचा फरक असल्याचा दावा केला जात असून, या खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.शेतकरी मागतील तेच बियाणे देणार : डॉ. तांबेयाबाबत पशुसंवर्धन उपायुक्त सोलापूर डॉ. ए. एस. तांबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी याबाबत तक्रार केली आहे. कोणत्या जातीच्या मक्यापासून अधिक चारा उत्पादन मिळते, याबाबत आम्हाला सविस्तर माहिती नव्हती. यापुढे शेतकरी ज्या जातीच्या मका आणि चारा बियाण्याची मागणी करतील, त्याच जातीचे बियाणे खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाईल.बायोसीड बियाणे परत करून अॅडव्हांटा ७४० द्या : डॉ. गौतम रोडेदूध उत्पादक शेतकरी डॉ. गौतम रोडे यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, बायोसीड जातीचे मका बियाणे संबंधित कंपनीला परत करून त्याऐवजी अॅडव्हांटा ७४० जातीचे बियाणे सर्व शेतकऱ्यांना वाटप करावे. त्यामुळे चारा उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. अन्यथा चारा उत्पादनात लाखो टनांची घट होण्याची शक्यता आहे.