
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील देवीचा माळ परिसरातील श्री कमलाभवानी देवी मंदिराच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत २ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून मंदिरासमोर भव्य गार्डन उभारणे, परिसराचे सुशोभीकरण करणे तसेच राजे रावरंभा निंबाळकर यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. गौतम रोडे यांनी दिली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे या विकासकामांसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या कामासाठी विशेष शिफारस केली होती. कमलाभवानी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल ऊर्फ आबा पाटील, अॅड. शिरीष लोणकर, राजनशेठ राठोड यांच्यासह अनेकांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.पर्यटन विभागामार्फत मंजूर झालेला निधी जिल्हा नियोजन मंडळाकडे वर्ग करण्यात आला असून, त्यामुळे विकासकामांना आता विशेष गती मिळणार आहे.श्री कमलाभवानी देवी मंदिर हे करमाळा तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी करमाळ्यात येत असतात. मंदिर परिसराचा विकास व्हावा, भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करमाळ्यात आले असताना त्यांनी श्री कमलाभवानी देवी मंदिराच्या विकासासाठी मदत करण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेची पूर्तता झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे……..मागणीला यश आल्याचे समाधान – सोमनाथ चिवटेमहाराष्ट्र शासनाने कमलादेवी मंदिर परिसराच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केल्याचे समजताच भाविकांमधून आनंद व्यक्त होत आहे. आमच्या सातत्यपूर्ण मागणीला यश आले असून, मंदिर परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल शासनाचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार, अशी भावना ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी व्यक्त केली.