करमाळा प्रतिनिधी

झरे गावातील यात्रेमध्ये अश्लील कार्यक्रम व ध्वनी प्रदूषणास तात्काळ बंदी घालून कायदेशीर कारवाई करण्याबाबत झरे गावातील सर्व सुजाण नागरिकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा मॅडम यांना निवेदन दिले.

निवेदनात असे म्हटले आहे की, आमचे गाव झरे येथे दिनांक २ एप्रिल रोजी होणारी जोतिबाची यात्रा ही धार्मिक व पारंपरिक स्वरूपाची असून गावाच्या श्रद्धेचा अत्यंत संवेदनशील विषय आहे. मात्र, मागील काही वर्षापासून या यात्रेमध्ये उघडपणे अश्लील नृत्य, अश्लील गाणी आयोजित केले जात आहेत. हे प्रकार सार्वजनिक ठिकाणी उघडपणे घडत असून ते समाजातील नैतिक मूल्ये, महिलांचा सन्मान व सार्वजनिक शिस्त यांना बाधा आणणारे आहेत.

तसेच DJ च्या माध्यमातून प्रचंड ध्वनीप्रदूषण निर्माण केले जात असून, यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. वरील प्रकार हे भारतीय दंड संहिता तसेच ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणारे असून कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे आहेत. म्हणून आपणास नम्र विनंती करण्यात येते की, अश्लील नृत्य व अशा प्रकारच्या कार्यक्रमांना तात्काळ परवानगी नाकारण्यात यावी. अशा कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. DJ व ध्वनीप्रदूषणावर कायदेशीर मर्यादनुसार कडक नियंत्रण ठेवण्यात यावे. यात्रेदरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी. आपण या बाबीकडे तात्काळ व गंभीरतेने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती.

यावेळी सरपंच मंजुश्री मयूर मुसळे, प्रहार शेतकरी संघटनेचे ता.उपप्रमुख सोमनाथ जाधव व गावातील सर्व सुजाण नागरिक उपस्थित होते.

या निवेदनाचे प्रत माहितीसाठी पोलिस निरीक्षक, तहसिलदार व महिला बालविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *