कुंभेजच्या मातीतील रंगकलेचा दिल्लीत राष्ट्रीय कलाविष्कार!

शिखा शर्मा आणि डॉ. गणेश करे-पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

चित्रकार निवास कन्हेरे यांची कला राजधानीतील प्रतिष्ठित त्रिवेणी कलादालनात

————————————

कुंभेज, ता. करमाळा : ग्रामीण भागातील प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणारे कुंभेज येथील प्रतिभावान चित्रकार निवास कन्हेरे यांच्या निवडक चित्रांचे प्रदर्शन राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित त्रिवेणी कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. २३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनाचे नाव ‘प्रिझमॅटिक रेझोनन्सेस’ (Prismatic Resonances) असे आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन २३ नोव्हेंबर रोजी विश्वस्त शिखा शर्मा आणि यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश करे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कुंभेजसारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेला निवास कन्हेरे यांचा कलाप्रवास थेट देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचल्याने करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

निवास कन्हेरे यांनी कलाशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अध्यापनाबरोबरच चित्रकलेतील सातत्यपूर्ण साधना आणि नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी व्यावसायिक चित्रकार म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या चित्रांना मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीसह दुबई, कतार आणि अमेरिका येथे प्रदर्शनाची संधी मिळाली आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमधील कलादालनांतही त्यांच्या कलाकृती प्रदर्शित झाल्या आहेत. आता दिल्लीतील प्रतिष्ठित त्रिवेणी कलादालनातील प्रदर्शनामुळे त्यांच्या कलाप्रवासाला आणखी व्यापक व्यासपीठ मिळणार आहे.

‘प्रिझमॅटिक रेझोनन्सेस’ या चित्रमालिकेत रंग, आकार, रेषा आणि प्रकाश यांच्या माध्यमातून विविध भावभावना व जीवनानुभव व्यक्त करण्यात आले आहेत. अमूर्त चित्रशैलीतील या कलाकृतींमध्ये रंगांच्या विविध छटा, आकारांची मांडणी आणि त्यांतील परस्परसंबंध यांमधून एक वेगळे दृश्यविश्व साकारले आहे. काही चित्रांत शांतता व स्थैर्य जाणवते, तर काही चित्रांत संघर्ष, अस्वस्थता आणि बदलांचे प्रतिबिंब दिसते. चित्रांचा अर्थ प्रेक्षकांवर न लादता त्यांना स्वतःच्या अनुभवातून तो शोधण्याची संधी देणे, हे कन्हेरे यांच्या चित्रशैलीचे वैशिष्ट्य आहे.

———————————

“ग्रामीण प्रतिभेला राष्ट्रीय व्यासपीठ मिळणे ही अभिमानाची बाब!”

“कुंभेजसारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेल्या निवास कन्हेरे यांनी आपल्या कलासाधनेच्या बळावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहण्याचा आणि त्यांच्या कलाकृती प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद मला मिळाला होता. त्या वेळी देश-विदेशातील विविध कलारसिक, क्युरेटर आणि कला क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधीही मिळाली. कन्हेरे यांच्या चित्रांमधील प्रयोगशीलता, रंगांची अभिव्यक्ती आणि विचारांची खोली निश्चितच कलारसिकांना आकर्षित करेल. ग्रामीण भागातील कलाकारांमधील प्रतिभा आणि सर्जनशीलता अशा प्रतिष्ठित व्यासपीठांमुळे व्यापक स्तरावर पोहोचते. त्यांच्या या कलाप्रवासाचा आम्हाला विशेष अभिमान असून, त्यांच्या पुढील कलात्मक वाटचालीस यशकल्याणी संस्था नेहमीच सहकार्य करेल.”

– डॉ. गणेश करे-पाटील, अध्यक्ष, यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *