इथून पुढे विधवा महालक्ष्मी हा सण साजरा करा- प्रमोद झिंजाडे
करमाळा दि.५/०१/२०२३ येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गुळसडी येथे सुरु असलेल्या विशेष श्रम संस्कार शिबिरामध्ये आज महात्मा फुले समाज सेवा मंगळाचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार प्राप्त समाजसेवक प्रमोद झिंजाडे यांचे विधवा प्रथा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुळसडी येथील रत्नमाला गायकवाड या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून अर्चना गायकवाड, योगिता जानभरे आणि सूरज भंडारे हे मान्यवर उपस्थित होते.
एन एस एस चे कार्यक्रम अधिकारी प्रा प्रमोद शेटे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
आपल्या संवादरूपी व्याख्यानामध्ये झिंजाडे यांनी भारताबरोबरच परदेशातील विधवा प्रथेचे स्वरूप गंभीर व अमानुष असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच विधवा प्रथा कायद्याने बंद करण्यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. हेरवाड ग्रामपंचायतीने जसा विधवा प्रथाबंदीचा ठराव संमत केला आहे तसा महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती ठराव करत असून लवकरच महाराष्ट्र शासन विधवा सन्मान व संरक्षण कायदा करून विधवा प्रथाबंदी कायद्याने बंद करेल असा विश्वास व्यक्त केला.
विधवा सन्मानाचे एक पाऊल म्हणून इथूनपुढे घराघरात विधवा महालक्ष्मी हा नवीन सण सुरु झाला पाहिजे आणि त्या सणाद्वारे विधवा महिलांना तीन दिवस त्यांचे पूजन करून त्यांना गोडधोड पक्वान्नाचे भोजन देवून गौरविण्यात आले पाहिजे म्हणजे विधवा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच हा सण साजरा करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबूतालीम शेख याने केले तर सुप्रिया पवार हिने आभार प्रदर्शन केले.