करमाळा प्रतिनिधी

माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या दूरसंचार संबंधित समस्या मांडल्या. मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे त्रस्त असलेल्या गावांमध्ये बीएसएनएल ची सेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी केली. तसेच, इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात यावी व डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवावी, यासाठीही निवेदन दिले.

ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव हा शिक्षण, आरोग्य आणि प्रशासनाशी निगडित सेवांमध्ये अडथळा निर्माण करतो. त्यामुळे बीएसएनएल सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी सेवा देणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली.

त्याबरोबरच माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण व अकलूज शहरात पासपोर्ट सेवा केंद्र (पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र – POPSK) स्थापन करणे.

याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघात नवीन पोस्ट ऑफिसेस सुरू करण्यासंदर्भात मागणी केली. ग्रामीण भागात डाक सेवांचा विस्तार व्हावा, अनेक गावांमध्ये पोस्ट ऑफिसच्या सुविधांचा अभाव आहे, ज्यामुळे स्थानिकांना बँकिंग, पत्रव्यवहार आणि इतर डाकसेवा उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी पोस्ट ऑफिसेस सुरू झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल.

या सर्व मागण्या संदर्भात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या प्रस्तावाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे देखील खा. मोहिते-पाटील यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *