
करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे हस्तांतरण बेकायदेशीरपणे रोखून आ.नारायण पाटील यांनी आदिनाथ कारखान्याचे वाटोळे केले. तोच कारखान्याच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचा घणाघात बारामती ॲग्रो चे व्हाईस चेअरमन तथा आ.रोहित दादा पवार यांचे विश्वासू सहकारी सुभाष आबा गुळवे यांनी संगोबा येथे महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी केला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजयमामा शिंदे, नागनाथ चिवटे, महेश चिवटे, उद्धव दादा माळी, निळकंठ अभंग, श्रीराम फलफले, संतोष जाधव पाटील, वामनदादा बदे, जामखेड तालुक्यातील कवडगाव चे माजी सरपंच मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ चे माजी संचालक किसन ढवळे (जामखेड तालुका) हे होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मी शरदचंद्र पवार पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षाचे करमाळा तालुक्यातील उमेदवार नारायण पाटील यांना माझ्या गावातसह परिसरातून मताधिक्य दिले ते राजकारण वेगळं होतं. आता आदिनाथ कारखाना चालवायचा असेल तर तो चालवण्याची क्षमता फक्त संजयमामा शिंदे यांच्यामध्येच मला दिसते आहे. त्यामुळे कारखाना सक्षम व्यक्तीच्या हातात यावा या प्रामाणिक उद्देशानेच महायुती च्या पॅनलच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत यामध्ये कोणतेही राजकारण नाही. फक्त सभासदांचे हित हाच त्या पाठीमागचा उद्देश आहे.
यावेळी सुजित बागल, विवेक येवले, अजित विघ्ने, राजेंद्र बाबर, भरत अवताडे, नंदकुमार जगताप महेश दादा चिवटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. महेश चिवटे म्हणाले की, महायुतीच आदिनाथ कारखान्याला उर्जित अवस्था देऊ शकते. वैयक्तिक मी उमेदवार नाही, परंतु आदिनाथच्या हितासाठी संजय मामांची क्षमता पाहून शिंदे यांची शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी अशी ही अभेद्य महायुती शरदचंद्र पवार पक्षाचे सुभाष आबा गुळवे यांच्या सहकार्याने निश्चितच विजय संपादन करणार आहे यात तीळमात्र शंका नाही. फक्त गुलाल घेऊन मामा थांबणार नाहीत तर कारखाना कसा चालवायचा याचे नियोजन सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पुढच्या पंचवार्षिक पर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने चालेल. एवढेच काय, कारखान्याची क्षमता वाढ होऊन कारखान्याचे उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प सुद्धा सुरू होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.