करमाळा प्रतिनिधी
“रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक जण हा जन्मल्यापासून मरेपर्यंत ग्राहकच असतो याची प्रत्येकाने जाणीव ठेवून रहावे. यासाठी किमान महिलांनी तरी सतर्कपणे आपले वर्तन ठेवून ग्राहकांचे हक्क जपण्याचे प्रयत्न करावे”, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख माधुरी परदेशी यांनी केले. त्या ग्राहक पंधरवड्या निमित्त सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या वतीने करमाळा येथील यशकल्याणी सेवाभावी संस्थेमध्ये महिलांसाठी आयोजित ग्राहक जागरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ग्राहक पंचायतीच्या तसेच ब्राह्मण सेवा संघाच्या अध्यक्षा तथा माजी मुख्याध्यापिका नीलिमा पुंडे, सदस्य ललिता वांगडे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या तालुकाध्यक्षा निशिगंधा शेंडे, शहराध्यक्षा अनिता राऊत आदि मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माधुरी परदेशी म्हणाल्या की, प्रत्येक ठिकाणी पावलोपावली आता आपण फसत चाललो आहोत. ही फसवणूक टाळण्यासाठी आपण जागृत राहिले पाहिजे. सर्व ग्राहक कायदे आपण वापरायला हवेत. शिस्तीत आणि चाकोरीबद्ध खरेदी आणि विक्रीचे व्यवहार हे झाले पाहिजे. यासाठीच ग्राहक पंचायत हे जागृतीचे काम करत आहे.
यावेळी माजी मुख्याध्यापिका तसेच ग्राहक पंचायत सदस्य नीलिमा पुडे, निशिगंधा शेंडे यांनी ग्राहका विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी ग्राहक पंचायत काय आहे याची माहिती उपस्थितांना त्यांनी दिली. महिलांनी खरेदी करताना काय काळजी घ्यावी, वेगवेगळ्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी वर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिलांनी ग्राहकाच्या संदर्भामध्ये विविध प्रश्न विचारले. विविध शंका उपस्थित केल्या. यावेळी त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय समता परिषदेच्या शहराध्यक्षा अनिता राऊत यांनी सर्वांचे स्वागत केले. आभार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष निशिगंधा शेंडे यांनी मांनले.