सोलापूर दिनांक 5 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यानुसार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्याच्या अकरा विधानसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. तरी या निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त केलेले सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडून ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहन अकरा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक जनरल निरीक्षक अफसाना परवीन, निधी निवेदिता, सादिक आलम, रितुराज रघुवंशी, सुबोध कुमार यांनी संयुक्तपणे केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूक 2024 च्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, पोलीस शहर उपायुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, स्वीप चे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे, सिव्हिलचे नोडल अधिकारी आशिष लोकरे, वाहतूक व्यवस्था नोडल अधिकारी गजानन नेरपगार, लिकर चे नोडल अधिकारी भाग्यश्री जाधव यांच्यासह अन्य नोडल अधिकारी, सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक जनरल निरीक्षक सुबोध कुमार म्हणाले की, निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण व्यवस्थित होणे हा महत्त्वाचा घटक आहे. त्याप्रमाणे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्याकडे नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व त्यांना प्रात्यक्षिक चांगल्या पद्धतीने करून घेतले पाहिजेत. मतदानाच्या दिवशी मतदानाची प्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही याची खात्री सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करून घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.
जिल्ह्यात स्वीप अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती जनरल निवडणूक निरीक्षक यांनी घेऊन हा कार्यक्रम अत्यंत काटेकोरपणे राबवून जास्तीत जास्त मतदाराचे प्रबोधन करून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना केल्या. यावेळी सर्व जनरल निवडणूक निरीक्षक यांनी निवडणूक कामकाजाची माहिती घेऊन सर्व संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात केलेल्या निवडणूक तयारीची सविस्तर माहिती बैठकीत दिली. तसेच सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजकुमार व पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण मध्ये पोलीस विभागाच्या वतीने निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले मनुष्यबळ तसेच कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
सी व्हिजील व जिल्हा नियंत्रण कक्षास भेट :-
विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात नियुक्त केलेले सर्व निवडणूक जनरल निरीक्षक यांनी जिल्हा नियोजन भवन मध्ये विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कक्ष तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षास भेट देऊन पाहणी केली.