करमाळा प्रतिनिधी
माढा तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावांना सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी बेंद ओढ्यातून देण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार संजयमामा शिंदे यांनी पाणी नाही आणलं तर विधानसभेला मत मागायला येणार नाही. आहे अशी आमदारकी सोडून देतो असे कुर्डूच्या सभेत जाहीर वक्तव्य केले होते. आज प्रत्यक्षात बेंद ओढ्यात पाणी सोडण्यास परवानगी मिळाल्यामुळे शब्द पाळणारे नेते म्हणून शिंदे बंधूबद्दल करमाळा व माढा मतदारसंघातील नागरिकांकडून प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.
माढा तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी, कुई, पिंपळखुटे, अंबाड, अंजनगांव (खे) या कायम दुष्काळी गावांना सिना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मंजूरी मिळाली आहे. माढा तालुक्यातील सिना-माढा उपसा सिंचन योजना ही माढा तालुक्यासाठी वरदायिनी ठरली आहे. या योजनेअंतर्गत 13 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. माढा तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी, कुई, पिंपळखुटे, अंबाड,जामगाव (खे) ही गावे कायम दुष्काळी पट्टयात् येत आहेत. दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याशिवाय गावांना पाण्याचा इतर कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही.
सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे बंद नलिका वितरण प्रणालीव्दारे बचत झालेल्या पाण्यातून लाभक्षेत्राबाहेर पाणी देण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्याबाबत लाभक्षेत्राबाहेर पाण्याची मागणी केल्यास त्या क्षेत्रास असणारी पाण्याची निकड इत्यादी बाबींवर विचार विनिमय/अभ्यास करुन बंद नलिका वितरण प्रणाली धोरणात सुधारणा करण्यासाठी दि.19/04/2023 रोजी शासन निर्णयान्वये समिती नेमण्यात आली होती. सदर समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला व त्यानुसार शासनाने आज शासन निर्णय काढला. बुधवार दि.26/06/2024 रोजी पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ व इतर संबंधित अधिकारी यांचेशी झालेल्या अंतिम बैठकीत वरील गावांना सिना-माढा योजनेचे पाणी देण्यास मंजूरी देण्यात आली. या निर्णयामुळे बेंद ओढा पट्ट्यातील सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.