माझ्या देशातला इतिहास आता बदलत आहे…

प्रसार माध्यमांद्वारे सध्या ठळकपणे प्रसार होत आहे की एनसीईआरटी च्या माध्यमातून इतिहासाच्या पुस्तकात काही बदल करण्यात येत आहेत.
(NCERT- National council for Educational Research and Training)(इ.१ ली ते १२ वी. पाठ्यपुस्तक)
उत्तर प्रदेश सरकारने निर्णय घेतला की एनसीईआरटीच्या माध्यमातून इतिहासचा काही भाग ते रद्द करणार आहेत आणि आता भारत सरकार ही देशाचा इतिहास बदलणार आहेत.
लाऊड स्पीकरवर बंदी सारखे यापूर्वीही कितीतरी जुने नवे बदल करण्यात आले. हे बदल खरच समाजमान्य आहेत का?असतील का?कारण असे काही बदल झाले की आधी राजकीय पेचात त्यांना अडकवले जाते.काही बदल खरच चांगलेही असतील ,पण त्यातूनही उणीवा या निघत असतात हे नाकारून चालणारं नाही.
अशा बदलांवर टीका टिप्पणी होणं ,चर्चा होणं साहजिकच आहे. समाज मनाचा कौल देखील अमान्य करून चालणारं नाही.
पण आज पाठ्यपुस्तकातील इतिहासाच्या काही नोंदी, काही घटना वगळून काही नव्या गोष्टीही त्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत.
गोष्ट चांगली वाटते पण नाण्याच्या दोन्ही बाजू समजावून घ्यायला समाज तयार असेल की नाही? माहित नाही! पण आपण मुलांना खरंच चांगलं सकस देणार आहोत ना? याचा विचार नक्कीच झाला असणार यात शंका नसावी.
इतिहासाच्या काही घटना वगळून काही नवीन भर टाकून नवा इतिहास घडणार आहे, पण हा बदल का करावासा वाटला? इतक्या दिवसाचा इतिहास आज का बदलावासा वाटला? हे प्रश्न तर सामान्य जनतेला नक्कीच पडले असतील आणि का पडू नयेत?
तर यावर असं उत्तर मिळतंय की यासारख्या अशा अनेक गोष्टी घटना दुसऱ्या ठिकाणी पण इतिहासात आहेत. म्हणून इयत्ता बारावीच्या इतिहासात हे बदल करण्यात आले आहेत. तोच तो पणा टाळला जावा , एकसारखे पणा किंवा पुनरावृत्ती होतेय म्हणून हे बदल आहेत.
इयत्ता बारावीच्या इतिहासाच्या पानांतून मुघलांना रिमूव्ह करण्यात आले आहे. बाबरा नंतर मुघल भारतात येतात तो भाग रद्द करण्यात आला. नॅशनल ह्युमन राईट मध्ये पण काही बदल करण्यात आला. शीत युद्धाचा तो भाग वगळण्यात येणार आहे. ज्यात नेहरूंची कुटनीती आंदोलनाचा उल्लेख आहे.
तसेच औरंगजेब आणि मुघल हे महान शासक होते आणि यांच्यासमोर महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवराय काहीच नव्हते हा बदल करण्यात आला. चुकीच्या पानांना हटवलं गेलं आणि खरा इतिहास मुलांसमोर आणला गेला.
सीबीएससी नव्या पाठ्यक्रमात एनसीईआरटीच्या माध्यमातून इयत्ता आठवी ते बारावीच्या इतिहासात काही बदल करत आहेत. धार्मिक चिन्हाच्या आधारावर कार्टूनला हटवलं जाणार आहे. हिंदू मुस्लिम युद्धासमय मंदिराला तडे जायचे तर या मंदिराची पुनर्बांधणी औरंगजेब करायचा.या अशा गोष्टी आता इतिहासात बदलणार आहेत.वगळण्यात येणार आहेत.
अतिरेकी काय आहेत? ते कसे असतात?त्यांचे परिणाम शेवटी काय होतात?या अशा गोष्टीही नव्या इतिहासात दाखल होत आहेत.
गोष्ट चांगली आहे कौतुकास पात्रही आहे.
खरंतर मुलांना तेवढाच इतिहास शिकवला गेला जेवढा राजकीय नेत्यांनी स्वार्थासाठी पसरवला. या गोष्टींचा विसर खरंच नको न व्हायला.
इतिहास बदलांची ही एक बाजू आपण पाहिली पण काही समाज या गोष्टी मान्य करेल कशावरून?
शालेय पाठ्यपुस्तकात मुघलच नसतील तर आमचे हिंदू राजे महाराणा ,प्रताप छत्रपती शिवराय यांच़ं अस्तित्व धोक्यात येऊ पाहतय असं का वाटू नये आम्हाला?
असा ही एक सूर समाजातून नक्कीच बाहेर पडणार आहे.
पाठ्यपुस्तकातून शत्रूच गायब केला मग आमच्या राजांची शुरता वीरता आमच्या मुलांना कशी कळणार ? त्यांचा संघर्ष व त्यांचा लढा कधी समजणार ? भारतीय हिंदू राजांची दैदीप्यमान कामगिरी नष्ट नाही का होणार? आमचे शूर वीर राजे कोणाविरुद्ध कसे लढले?हा इतिहास लपवून चालणारं आहे का?
इतिहासाच्या पानात मुघलच नसतील तर शिवरायांचा पराक्रम कसा दाखवणार? शिवरायांचा, महाराणांचा पराक्रम हा काल्पनिक पात्र रंगवून सांगण्यासारखा आहे का? हा तीन तासाचा सिनेमा नाही.आणि कल्पनेतला इतिहास तर नक्कीच नाही. हा बलिदानाचा इतिहास आहे.
छत्रपती शिवराय हे आमचे बहुजनांचे दैवत आहे भविष्यात आपली पिढी ही निर्भय धाडसी सुसंस्कृत बनावी वाटत असेल तर छत्रपती़ंचा इतिहास आणि त्यांचे युद्ध कोणाबरोबर होतं कोणाबरोबर झालं हे नव्या पिढीला कळालं पाहिजे. औरंगजेब, मुघल यांना सळो की पळो करणाऱ्या मावळ्यांचा इतिहास आणि संविधान आम्हाला जीव की प्राण आहे हे वारंवार सांगावं लागू नये आणि भारतीयांच्या अस्मितेला तडा जाऊ नये केवळ हीच अपेक्षा.
समीक्षा वाले समीक्षा करतील. विचारवंत यावर आपले मत मांडतील ही, पण जे चांगलं आहे, भावी पिढीसाठी योग्य आहे आणि संस्कारानं परिपूर्ण असणारं आहे. असा बदल निश्चित करावा नव्हे तो व्हावा.असे प्रामाणिक मत माझे आहे.
©️🖋️ अंजली राठोड श्रीवास्तव.करमाळा.
(साहित्यिक/सामाजिक कार्यकर्त्या)
७७०९४६४६५३.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *