स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचा उपक्रम ; प्रा. डॉ. सारिका विटुकडे व प्रा. रूपाली थोरात करणार मार्गदर्शन

करमाळा प्रतिनिधी

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची प्रभावी तयारी करता यावी, या उद्देशाने स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल, करमाळा यांच्या वतीने विशेष मोफत नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सारिका विटुकडे (संचालिका, विटुकडे क्लासेस) आणि प्रा. रूपाली थोरात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेमध्ये नवोदय प्रवेश परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम, बुद्धिमत्ता चाचणी, गणितीय क्षमता, भाषिक कौशल्ये, अभ्यासाचे नियोजन, प्रभावी अभ्यासपद्धती, प्रश्नपत्रिका सोडविण्याचे तंत्र, वेळेचे व्यवस्थापन, सराव प्रश्नांचा अभ्यास आणि परीक्षेच्या काळात मानसिक संतुलन व आत्मविश्वास कसा टिकवावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नवोदय प्रवेश परीक्षेच्या स्वरूपावर आधारित प्रत्यक्ष सराव चाचणीही घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा अनुभव घेता येणार असून स्वतःची तयारी, प्रश्न सोडविण्याचा वेग आणि वेळेचे नियोजन तपासण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री जयंत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाच्या शिक्षिका शिवांगी कांबळे, प्रयाग दळवी आणि मुस्कान शेटे या कार्यशाळेच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

विशेष म्हणजे, ही कार्यशाळा केवळ स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नसून करमाळा शहरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत व खुली आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वनोंदणी आवश्यक नाही.

नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने करण्यात आले आहे.

योग्य मार्गदर्शन, नियोजनबद्ध अभ्यास आणि प्रत्यक्ष सरावातून नवोदय प्रवेश परीक्षेचा आत्मविश्वास वाढविण्याचा हा उपक्रम ठरणार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *