
उजनी परिसरातील एआय कॅम्पस व डेटा सेंटर ची तांत्रिक माहिती उपलब्ध करावी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
करमाळा (प्रतिनिधी): उजनी जलाशय परिसरातील प्रस्तावित एआय कॅम्पस, डेटा सेंटर व ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाच्या पाणी वापर व पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने सविस्तर व तांत्रिक माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मुख्य सचिव, प्रधान सचिव जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी सोलापूर, कार्यकारी संचालक कृष्णा खोरे महामंडळ ,कार्यकारी अभियंता उजनी धरण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
प्रकल्पासाठी सांगितल्या जाणाऱ्या पाणी वापराची नेमकी गणना, शीतकरणासाठी लागणारे पाणी, पाण्याचा पुनर्वापर, पाण्यावर तरंगणारा सौर प्रकल्पा मुळे होणारी पाणीबचत तसेच दुष्काळी परिस्थितीत प्रकल्पाला पाणी देण्याचे निकष याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.
तसेच या प्रकल्पामध्ये अणुभट्टी अथवा Small Modular Reactor (SMR) प्रस्तावित आहे का, याबाबत शासनाने अधिकृतपणे स्पष्ट करावे, अशीही मागणी केली आहे.
उजनी जलाशयावर सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागातील पिण्याचे पाणी, शेती, सिंचन, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक उपजीविका अवलंबून आहेत. त्यामुळे विद्यमान लाभार्थ्यांचे हक्क, भविष्यातील पाण्याची गरज आणि दुष्काळी परिस्थिती यांचा विचार करूनच पुढील निर्णय घेणे आवश्यक आहे.
उजनीच्या पाण्याच्या हक्काचे संरक्षण आणि स्थानिक जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य मिळाले पाहिजे म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा विभाग, कृष्ण खोरे महामंडळाकडे पत्रव्यवहार करून या प्रकल्पाविषयी अधिक स्पष्टता आणावी यासाठी मागणी केली.
