
करमाळा प्रतिनिधी
अजित बाबुराव रोकडे यांना École Centrale de Lyon आणि University of Adelaide मध्ये PhD करण्यासाठी MSCA Fellowship प्राप्त.
सोलापूर जिल्ह्यातील वांगी नं. 3, ता.करमाळा येथील अजित बाबुराव रोकडे यांना अत्यंत प्रतिष्ठित MSCA Fellowship प्राप्त झाली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून त्यांना फ्रान्समधील École Centrale de Lyon आणि ऑस्ट्रेलियातील University of Adelaide येथे PhD संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. अजितने एरोअकॅस्टिक्स या क्षेत्रात आपल्या संशोधनासाठी या फेलोशिपसाठी अर्ज केला होता, ज्यामध्ये ‘वॉल प्रेशर फ्लक्चुएशन स्पेक्ट्रा’ या विषयावर त्याचे संशोधन केंद्रित आहे.

MSCA Fellowship ही युरोपियन युनियनतर्फे दिली जाणारी एक अत्यंत प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक फेलोशिप आहे. दरवर्षी जगभरातील हजारो संशोधक यासाठी अर्ज करतात, मात्र केवळ 67 निवडक संशोधकांना ही संधी मिळते. या फेलोशिपमध्ये संशोधन खर्च, शिक्षण शुल्क, प्रवास खर्च, तसेच मासिक मानधनाचा समावेश आहे. एकूण फेलोशिपची किंमत INR 3.52 कोटी आहे, जी संशोधनासाठी लागणाऱ्या सर्व खर्चाला पुरेसा आधार देते.

अजित हा शेतकरी कुटुंबात जन्मलेला असून त्याचे आई-वडील, नीरा, बाबुराव रोकडे, यांनी अनेक अडचणींवर मात करत खूप कष्टाने आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या अथक मेहनतीमुळे अजितला शिक्षणाच्या उच्च शिखरावर पोहोचण्याची संधी मिळाली. अजित कुटुंबातील पहिला STEM (Science, Technology, Engineering, and Mathematics) क्षेत्रातील शिकलेला विद्यार्थी आहे. अजितच्या तीन मोठ्या बहिणी, उज्वला रोकडे-कदम, सुवर्णा रोकडे-पिसाळ, आणि ॲड. सुनंदा रोकडे-भगत, सर्व शैक्षणिक दृष्ट्या यशस्वी असून, त्यांनी अजितच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासात त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.
अजितने अमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री आणि जैन युनिव्हर्सिटी, बंगलोर येथून एरोडायनॅमिक इंजिनिअरिंगमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला ‘टॉप ॲकॅडेमिक परफॉर्मर’ पुरस्कार आणि ‘गोल्ड मेडल’ मिळाले. अजितचे यशस्वी वाटचालीमुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
व्यावसायिक जीवनात अजीतने एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) DRDO, VTOL Aviation India Pvt. Ltd., आणि Whirlpool सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. विशेषतः, IIT बॉम्बे मध्ये प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट म्हणून काम करत असताना, त्याने मिसाईल एरोडायनॅमिक्स आणि स्टोर सेपरेशन ट्राजेक्टोरीसाठी डेटा-चालित रिड्यूस्ड-ऑर्डर मॉडेलिंग विकसित केली.
अजीतच्या या यशामुळे त्याला École Centrale de Lyon आणि University of Adelaide मध्ये संशोधनाची पुढील पायरी गाठण्याची संधी मिळाली आहे. यामुळे एरोअकॅस्टिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स या क्षेत्रातील नवनवीन संशोधनाला चालना मिळेल.